भरारी नेतृत्वाची

Anusaya Navale of Wadgaon village

Read in English

अनुसया नेवळे रा. वडगाव ता.मुखेड जिल्हा नांदेड, जन्म झाल्यापासून गावातून कधीच बाहेर गेली नाही. कारण सासर आणि माहेर देखील वडगाव आहे.कधी कुठल्या यात्रेला नाही, लग्न समारंभाला नाही, कधी बाजार आणण्यासाठी गावाच्या बाहेर जाणे नाही. पतीच्या निधनानंतर त्याच गावात राहिल्या एकल अवस्थेत. एकल महिला संघटनेच्या बैठकीला पहिल्यांदा गावाबाहेर पडल्या आणि मुखेडला गेल्या.

पुढे २९ मार्च ला भरारी नेतृत्वाची कार्यक्रमाचे आयोजन झाले आणि पहिल्यांदा अश्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनुसया गावाबाहेर पडल्या. तसेच एकल असल्यामुळे केसांत गजरा माळायची समाजात मनाई त्यामुळे आयुष्यात गजरा कधीच घातला नाही.

तालुक्याच्या बाहेर भरारी नेतृत्वाची या कार्यक्रमाला चाकूरला जाण्याचा योग आला. आयुष्यात कधीही गजरा हातात घेतला नाही पण चाकूर च्या कार्यक्रमात पहिल्यांदा गजरा केसांना लावला. गजरा हातात पडताच अनुसयांना आधी धक्का बसला पण सोबती एकल महिलांनी गजरे घातलेले पाहून त्यांनी धैर्य दाखवले आणि गजरा लावून हा बंधनकारक सामाजिक नियम त्यांनी मोडला.

गेली ४ वर्षे मराठवाड्यातील एकल महिला कार्यक्रमाने जवळपास ३००० एकल महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे, त्यांना सक्षम केले आहे. चार भिंतींच्या आत जगणाऱ्या महिला आज एकल महिलांचा नेतृत्व करत आहेत असं लांबचा पल्ला त्यांनी गाठला आहे. एकल महिलांनी गेल्या काही वर्षांत गावोगावी भेट देऊन महिलांना संघटीत करत २१५ गावांमध्ये महिला मंडळे तयार केली आहेत त्याचबरोबर महिला मंडळाच्या अध्यक्षा, सचिव, गावप्रमुख अशा भूमिका समर्थपणे निभावत आहेत.

२९ मार्च २०१८ हा दिवशी मराठवाड्यातील चाकूर या ठिकाणी एकल महिलांनी “भरारी नेतृत्वाची” या मेळाव्याचे आयोजन केले. उद्देश होता २१५ गावातील एकल महिलांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांनी एकत्र येणे व आपले एकल महिलांच्या प्रश्नांवर काम करतानाचे अनुभव, आव्हाने शेयर करणे आणि पुढील दिशा ठरवणे:

कार्यक्रमचे पुढील उद्देश होते:

  • क्लेशदायक सामाजिक नियम तोडणे
  • संघटना बांधणी आणि सक्षमीकरण
  • मराठवाडयातील एकल महिलांना जोडून घेण

कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन पूर्णतः एकल महिलांनी करत, मेळावा यशस्वी केला ही एक वैशिष्ठपूर्ण गोष्ट होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन भाषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मंगल खिवसरा यांनी केले ज्यात त्यांनी आपले दलित हक्कांवरचे काम तसेच हिंसाचाराचा प्रतिकार कसा करावा यावर महिलांशी संवाद साधला. मेळाव्याची सुरुवात “महिलांनी सार्वजनिक ठिकाणी नृत्य करू नये” या सामाजिक नियमाला तोडून झाली. एकल महिलांनी “झिंगाट” या गाण्यावर मनमुराद नाच करून स्वतःला व्यक्त केले. त्यानंतर महिलांचे विविध गट तयार झाले ज्यांनी बंधनकारक सामाजिक नियम आणि त्यातून होणारा भेदभाव यावर गटचर्चा झाली. प्रतीकात्मकरित्या हे सामाजिक नियम फुग्यांवर लिहिण्यात आले आणि प्रत्येक सामाजिक नियमावर चर्चा होऊन ते फोडण्यात आले. अशा प्रकारे या विषारी नियमांना महिलांनी झुगारले.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्टे:

  • ६०० महिलांनी एकल महिलांचे प्रश्न आणि ते हाताळताना आलेले अनुभव कथन केले
  • उपस्थित महिलांना आपल्यासारख्याच एकल महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या महिला पाहून प्रेरणा मिळाली
  • मराठवाडा विभागातील विविध ठिकाणांवरून आलेल्या महिलांनी शेयारिंग केले

सर्वमताने कार्यक्रमाची पुढील दिशा पुढीलप्रमाणे ठरवण्यात आली:

  • एकल महिलांची संघटना बळकट करणे.
  • एकल महिला संघटनेत लोकशाही रुजविणे.
  • बंधनकारक सामाजिक नियम तोडण्यावर भर देणे.

CORO’s Single Women campaign is supported by our partners and friends at the Edelgive Foundation.