रात्री 12 पर्यंत प्रशिक्षण घेणाऱ्या कोलाम समुदायातील महिलांची प्रेरणादायी गोष्ट

‘नवी उमेद’ संस्था २००७ पासून , विदर्भात कोलाम व इतर आदिवासी समुदायांसोबत काम करत आहे. वनहक्क कायद्याबद्दल जनजागृती , सामूहिक  वन हक्क यावर त्यांचे काम आहे. ‘कोरो इंडिया’ सोबत ही संस्था 2008 पासून जोडलेली आहे. या वर्षी कोरोच्या समता, ग्रुप फेलोशिपसाठी संस्थेतील 4 लीडर्सची निवड झाली आहे. ‘कोलाम समाजाला सन्मानपूर्ण जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न कारणे ‘ हा त्यांनी निवडलेला विषय आहे व यावर येत्या 3 वर्षात ते काम करणार आहेत. या विषयाअंतर्गत यावर्षी त्यांनी कोलाम महिलांसोबत आर्थिक स्वावलंबनाच्या मुद्द्याला घेऊन कामाला सुरुवात केली आहे.

कोलाम समुदाय हा विशेषत: असुरक्षित आदिवासी गटात मोडतो. त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य , कायदे हे फार कमी प्रमाणात पोहोचले आहेत. कोलाम समाजाची  जीवनशैली ही पूर्णपणे जंगलावर आधारलेली आहे.  पूर्वापार मध काढण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे परंतु त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन व्यापारी त्यांची फसवणूक करत होते. गेल्या 12 वर्षापासून, कोलाम समुदायातील पुरुषांना शास्त्रशुद्ध पद्धतीने  मध कसा  गोळा करता येऊ  शकतो , याचे प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आले. तसेच त्यांच्या मधाला चांगला भाव मिळावा यासाठी काम सुरु केले.

पुरुषांसोबत काम करताना, महिलांसोबत रोजगारवर काम करता येईल का ? याचा अभ्यास व चर्चा सुरू झाली . यवतमाळ व नांदेड जिल्ह्यतील आदिवासी समाजातील महिला सध्या आर्थिक बोज्याखाली आहेत हे समजले. संस्थेतील लीडर्स , महिलांशी बोलले तेव्हा  बाकी प्रश्नांच्या बरोबर, आर्थिक प्रश्न सोडवणे जास्त महत्वाचे आहे असे जाणवले.

कोलाम समाजातील महिला जंगलातील वनउपज गोळा करण्यात जातात तसेच महिला व पुरुष दोन्ही जिल्ह्यात बांबु काम ही करतात. बांबुपासून तट्टे व टोपल्या बनवून विकतात. पिढ्यांपिढ्या चालत आलेले जंगलाबद्दलचे ज्ञान आणि पारंपरिक कौशल्ये त्यांच्याकडे आहेत. त्यांना जर यासबंधी प्रशिक्षण दिले तर त्यांना कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळू शकते असा विचार संस्थेने लोकांच्या सोबत केला. दोन्ही तालुक्यातील 50 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. महिलांच्या बांबु प्रशिक्षणासाठी, मशीन पुरवठा करण्यासाठी  प्राज फौंडेशन, पुणे यांनी मदत केली. महिलांचे प्रशिक्षण हे 15 दिवसांचे होते.

कार्यकर्ते बांबु प्रशिक्षणाबद्दल महिलांशी आधीच बोलल्यामुळे त्यांची बांबु  प्रशिक्षण घेण्याची तयारी होती. परंतु त्यांना प्रश्न होता की, जर आम्ही ह्या प्रशिक्षणात सहभागी झालो तर आमची मजुरी बुडेल. येणारे दिवस हे लग्नाचे आहेत, परत आम्हाला मजुरीचे पैसे बुडवून चालणार नाही कारण डोक्यावर कर्ज आहे. , हे सगळे प्रश्न असल्यामुळे पुरुषांचा पण काही प्रमाणात विरोध होता.यावर दोनदा बैठका झाल्या, मग महिलांनींच मार्ग काढला व रात्री प्रशिक्षण घेण्याचे ठरले. महिलांनी रात्री  8 ते 12 पर्यन्त बसून शिकण्याची तयारी दाखवली व  प्रशिक्षण पूर्ण केले. महिला दिवसभर घरातली व बाहेरची मजुरीची कामे करत होत्या व दिवस मावळला की नवीन शिकायचे या जिद्दीने प्रशिक्षणाला हजेरी लावत होत्या.

सुरुवातीला प्रशिक्षणाला येण्यास महिला घाबरत होत्या. आपण प्रशिक्षण पूर्ण करू का, आपल्याला शिकविलेल्या वस्तू करता येतील  का ? असे खूप सारे प्रश्न त्यांना पडत होते. परंतु संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परत परत संवाद साधून महिलांना तयार केले . तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून , दारूबंदी असणारी गावे प्रशिक्षणासाठी निवडली गेली. ज्यामुळे रात्री उशिरा प्रशिक्षण संपवून घरी जाताना महिलांना सुरक्षित वाटेल. नवी उमेद संस्था महिलांना प्रशिक्षित करण्यात पुढाकार घेतेय याचे स्वागत करणारे कोलाम समुदायातील काही पुरुष ही या सगळ्या प्रक्रियेत सोबत होते.

प्रशिक्षणाला काही दिवस झाल्यावर महिला कितीही काम असले तरी रोज हजेरी लावत आहेत हे दिसून आले.  त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व वेगळा आनंद दिसत होता, त्यांनी स्वतःहून काही नवीन गोष्टी करून बघितल्यामुळे त्यांना हे प्रशिक्षण हवेहवेसे वाटत होते. काही महिला प्रशिक्षणात उत्साह वाढावा म्हणून  आपली  पारंपरिक गाणी म्हणत होत्या. ‘अनुसया’ तिच्या सासूसोबत या प्रशिक्षणाला येत होती. आधी तिला काहीच येत नव्हते, पण तिच्या सासुबाई बांबू कामात हुशार होत्या , त्यांनी तिला सोबत घेऊन काही गोष्टी शिकविल्या. काही गोष्टी दोघींनी मिळून बनविल्या. दामबाईला आपल्या नवऱ्या बरोबर आपल्याला ही आता बांबुकाम  येते याचा आनंद होत होता. बऱ्याच दिवसांनी असे एकत्र बसल्यामुळे , सोबत शिकल्यामुळे एकमेकांना समजून घेता आले. त्याच बरोबर आपण हा व्यवसाय कसा वाढवु शकतो, त्यावर महिलांनी  चर्चा करण्यास सुरवात केली, यातूनच त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दिसून येत होता .   

   महिलांना एकत्र आणण्यासाठी आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी सपोर्ट गटाची स्थापना करण्यात आली. या गटांमुळे महिलांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण, समस्या सोडवणे आणि सामूहिक निर्णय घेणे सुलभ झाले. प्रशिक्षणानंतर प्रत्येक सहभागी महिलेला ३५०० रुपयांचे बांबू किट देण्यात आले, ज्यामुळे त्या स्वतः उत्पादन सुरू करू शकतील. त्यांना बाजारपेठ कशी शोधावी याचे प्रशिक्षण ही देण्यात आले. त्यांना विविध ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी पण उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनामुळे त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली आणि त्यांना विक्रीचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले. आपण बनवलेल्या वस्तूंची माहिती मोबाईलवर व्हिडीओ बनवून कशी सांगायची ते ही महिला हळूहळू शिकत आहेत. बांबू उत्पादनांची एकूण ६,००० रुपयांची विक्री झाली.

या भागातील बांबू व्यवसाय आता कुठे नावारूपाला येत आहे. या उपक्रमातून, कोलाम समुदायातील महिलांनी स्वत:चे पारंपारिक ज्ञान व कौशल्य जपत, आर्थिक स्वावलंबी बनावे. आदिवासी समुदायातील स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या की त्यांचा आत्मविश्वास वाढेल. समाजातील चुकीच्या पद्धती व रूढी परंपरांना अजून ठामपणे विरोध करू शकतील, व समाज बदलेल, असा विश्वास नवी उमेद  विचार आहे. यापुढे त्यांना ‘शबरी विकास महामंडळ’ किंवा ‘मानव विकास मिशन’ यांच्याशी जोडुन देणे, हा विचार आहे. त्यातून  त्यांना लागणारे काही साहित्य खरेदी करता येईल. यासाठी त्यांचे MSME पोर्टल वर रजिस्ट्रेशन व बँकेत खाते उघडून  देण्याचे काम ही संस्था करत आहे.

50 कोलाम महिलांनी  जिद्दीने , भीती बाजूला सारत , आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यांचा हा प्रवास प्रत्येक आदिवासी महिलेसाठी प्रेरणादायी आहे.