डॉ. सुजाता खांडेकर
‘‘मिळून साऱ्याजणी’च्या गीतालींनी दिवाळी अंकासाठी ‘ग्रासरूट्स फेमिनिजम’ हा विशेष विभाग करणार असल्याच सांगितलं. मनापासून आनंद वाटला. गेल्यावर्षीच्या लोकसत्ताच्या सदरांमधून आम्ही मांडलेली ‘ग्रासरुट्स फेमिनिजम’ ही संकल्पना कुठेतरी मूळ धरते आहे, महत्वाची वाटते आहे याचा तो आनंद होता.
वर्षभर लिहिण्याची संधी मिळालेल्या सदराला दिलेले ‘ग्रासरुट्स फेमिनिझम’ शिर्षक अकारण नव्हते. ते केवळ शिर्षक नव्हते, ती संकल्पना होती, सिद्धांत होता. स्त्री-चळवळीचा प्रवास, त्यातून स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल झालेली जाण, त्यातली ताकत, निरीक्षणे, झालेला थोडा अभ्यास, चळवळीचे थोडेफार काम, तयार झालेले संघटनात्मक आणि व्यक्तिगत नातेसंबंध हे या संकल्पनेच्या मुळाशी आणि पार्श्वभूमीवर होते. या शिदोरीशिवाय पुढचा विचार शक्य नव्हता.
कोरो संघटनेच्या तीनेक दशकाच्या कामातून ग्रासरुट्समधल्या मैत्रिणीं-मित्रांबरोबर समृद्ध करणारा सहप्रवास झाला. त्यात पाहिलेले, अनुभवलेले, जाणवलेले, आकलन झालेले, स्वताःलाच अनेक अर्थाने भेटवणारे अनुभव स्त्री चळवळीची जाणीव विकसित करणारे होते. स्त्रियांच्या हक्काचीचं आणि आत्मसन्माचीचं बाब असली तरी अनेक बाबतीत प्रचलित स्त्रीचळवळीचा अवकाश, समज, मांडणी आणि व्यवहारावर प्रश्न निर्माण करणारे हे अनुभव होते. हे वेगळेपण मांडण्याची गरज वाटत होती, त्यामुळे नुसतचं ‘फेमिनजम ’ म्हणायचे नाही हे ठरलं होत. हे अनुभव कोणत्याही एकाच वंचित समूहाबाबतीतले नव्हते. पिचलेल्या, अनेक विषमतांचा दाह सोसलेल्या, सामाजिक दृष्टीने वंचित सर्व गट-समूह-जाती-जमातीच्या मैत्रिणींचे हे विश्व आहे. इथे जातीच्या उतरंडीचा आर्थिक उतरंडीशी असलेला संबंध स्पष्ट दिसतो. ह्या दोन्ही उतरंडिंचा स्त्रियांवर एकत्रित होणारा परिणाम दिसतो. म्हणजे स्त्री म्हणून मिळणारी विषमतेची वागणूक, त्यात गरीब स्त्री म्हणून अवहेलनेमध्ये भर, यात परत वंचित समूहातील गरीब स्त्री म्हणून अवहेलनेमध्ये आणखी भर. यातून वाट्याला येतो तो अवहेलनांचा एकत्रित अनुभव जो एकेका अवहेलनेच्या निव्वळ बेरजेपेक्षा अधिक आहे.शारीरिक किंवा लैगिक-पसंतीच्या दृष्टीने वेगळे असाल तर अवहेलनेमध्ये आणखी वाढ. अशी अनेक आयाम वाढू शकतात. आम्ही प्रौढ-साक्षरता प्रसाराचे काम करत होतो. जातीच्या, आर्थिक आणि स्त्रीत्वाच्या उतरंडीचा शिक्षणासारख्या मुलभूत बाबीत होणार्या विषमतेचा संबंध स्पष्ट पहिला. माझ्यासारख्या शिक्षणाची प्रत्येक संधी मिळालेल्या स्त्रीला ‘प्रौढ निरक्षर कोण आहेत? आणि तेच का आहेत? हे आधी न पडलेले प्रश्न पडायला लागले. ग्रासरुट्स हे अस कडबोळ आहे, अनेक विषमतांचा संदर्भ आणि परिणामांचा एकत्रित बनलेला context आहे. त्यातही अंतर्गत उच्च- निच्च प्रतवारी आहे. सत्ता संबंधांचे ताणेबाणे आहेत. न्याय-अन्यायाच्या रीतीभाती आहेत. मनुष्य स्वभावाचे कंगोरे आहेत. आणि संपूर्ण रचनेत सर्वात खाली स्त्रिया आणि पारलिंगी आहेत.
लेखमाला लिहिताना ग्रासरुट्स मधल्या मैत्रिणींचे व्यवहार, आत्मभान येण्याची आणि दिसण्याची संपूर्ण प्रक्रिया मुळाशी होती. गेल्या अनेक वर्षात ग्रासरुट्स हा शब्दही तसा अनोळखी किंवा इंग्रजी राहिलेला नाही. म्हणून ‘ग्रासरुट्स फेमिनिजम’.अथांग विविधता आणि सघन स्त्री-चळवळस्त्री चळवळीने स्त्रियांच्या स्थानात, विचारात,अस्मितेत, नाते संबंधात , अधिकारात, त्यांच्यावर लादलेल्याअसमानतेत मुळातून बदल होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली, चालना दिली.
स्त्रीयांना संधी आणि अधिकार
मिळण्यासाठी चळवळीत मोर्चे बांधणी सुरु झाली. जन्मण्याचा हक्क, शिक्षणाचा ह्कक, स्वताःच्या शरीरावरचा हक्क, निवडीचा हक्क, आर्थिक अधिकार, संपत्ती अधिकार, राजकीय अधिकार– अशी एकेक दालन उघडत, विस्तारत स्त्रीचळवळ समृद्ध झाली आहे. चळवळीने स्त्रियांचा सन्मान आणि अधिकार मिळवण्यासाठी कुटुंबव्यवस्था, समूह, कायदा, बाजार, शासन अशा अनेक संस्था-यंत्रणानमध्ये/बरोबर नेमके आणि एकत्रित काम केले. चळवळीचा भर सुरुवातीला व्यक्तिगत आणि नंतर सामुहिक प्रवासावर राहिला. व्यक्तिगत परिवर्तन, सामुहिक कृती, वेगवेगळ्या स्वरूपातील आंदोलन, स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास आणि ज्ञाननिर्मिती अशा अनेक परीघांमध्ये स्त्रीचळवळीने आपला ठसा उमटवला. अनेक प्रस्थापित मापदंड, मान्यताना आव्हान देऊन त्या मोडीतही काढल्या.
बराच काळ ही चळवळ एका ठराविक आवर्तनात अडकली सुद्धा… उच्चवर्णीय, उच्चवर्गीय स्त्रियांचे आवर्तन मुख्यतः स्त्री-शरीराशी निगडीत प्रश्नांभोवती घुटमळणारे आवर्तन, ठराविक पद्धतीने मांडणी आणि विश्लेषण करणाऱ्या आवर्तनात ती प्रक्रिया अडकलीही. जे जगभर झाले, तेच आपल्याकडेही झाले कारण काही संधी मिळालेल्या, किमान बरे जगण्याची हमी असलेल्या मैत्रिणींना अधिकाराचा, हक्काचा विचार करायची उसंत मिळाली होती. जगण्याची भ्रांत आणि अवमानाचा वारसा असलेल्या, ग्रासरुट्स समूहातील मैत्रिणी मात्र या प्रवाहापासून लांब राहिल्या होत्या. त्यांचे प्रश्न काही वेळा मांडले गेले, लढेही झाले, पण ती अतिरिक्त जोडणी (add-on) सारखे. काही मांडणीमध्ये मात्र दलित स्त्रीयानकडे दुर्लक्ष करून चळवळीपासून त्यांना दूर ठेवल्याचा जाब विचारला होता. पण त्यावेळी रूढ मानलेल्या स्त्री-चळवळीमध्ये सामान्यतः ह्या मैत्रिणी, त्यांचे प्रश्न, त्यांचे हक्क दुर्लक्षीत राहिले. किंवा त्यांच्या अनुभवाच विश्लेषण उच्चवर्णीय-उच्चवर्गीय स्त्रियांच्या भाषा, अनुभव आणि मापदंड लावून झाले.

( विदर्भातील या महिला तलावांना जिवंत करतात – शालू कोल्हे, सरिता मेश्राम कविता मोजे )
आपल्या समाजातल्या विविधतेचे आपल्याला किती अप्रूप आहे. सर्व कृतिकार्यक्रम आणि अभ्यास या दोन्हीत विविधतेचा (diversity) सतत उल्लेख असतो. कोरोच्या कामातून ग्रासरुट्स मैत्रिणींबरोबर अधिक आणि खोलवर काम व्हायला लागल्यावर विविधतेचा अर्थ अधिक समजायला लागला. माझं विविधतेच आकलन, अप्रूप याची खोली आणि खरेपणा तपासायला पाहिजे अस जाणवायच. (शाळेतल्या प्रतिज्ञेत उल्लेख असलेली ‘समृद्ध आणि विविधतेने नटलेली परंपरा’ तेव्हाही फक्त शब्द होते). विविधतेच्या आकलनाचा तपास सर्व चळवळीतल्या सर्वांनी करायला हवा असं वाटायला लागल. मग ती वर्गलढ्यालाच गाभा मानणारी डावी चळवळ असो वा उत्तर-आधुनिक काळातली स्त्री-चळवळ ( किंवा अन्य) असो. आपल्या घराच्या खिडकीतून दिसणारे जगच आपल्या विविधतेच्या जाणिवांच आणि विश्लेषणाच अवकाश बनलं तर अनेक प्रश्न तयार होतात. विविधतेच्या पसार्याइतकेच (व्यापकता या अर्थाने) त्यातल्या गुंतागुंतीचेही अप्रूप आणि आकलन हवे. उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय जाणीवा घेऊन कामाला सुरुवात केलेल्या मला प्रत्येक ग्रासरुट्सची मैत्रीण म्हणजे विविधतेच्या गुंतागुंतीच एक बिकट आकलन वाटत होत.

( भटके विमुक्त आदिवासी ग्रासरूट महिला नेतृत्व )
उदाहरणार्थ, मेळघाटच्या अतिवंचित, आदिवासी भागातली कोरकू समूहातली गंगा जावरकर जेव्हा, “आलेगा जाटोबी सृष्टी गोण जुडाकेन (आमची आडनाव पण निसर्गाला जोडूनच). राजे- महाराजे हल्ला करायचे तेव्हा लॉक ठिकठिकाणी लपायचे. जमिनीत लपणारे कसबेकर, गवतात लपणारे जावरकर किंवा बुसुम, पाण्यात लपणारे माउसकर, बिवा झाडत लपणारे बिलावकर, जामूनच्या झाडात लपणारे जांबेकर… वगैरे ” असं सांगते, तेव्हा समूह आणि कॉन्टेक्स्ट समजून घेण्याचा पट केवढा विस्तारतो!! केवळ चार आदिवासी आडनाव माहिती होऊन उपयोगाचे नाही. त्यांचा इतिहास आहे, अन्याय आहे, संघर्ष आहे, भाषा आहे, संस्कृती आहे, नातेसंबंध आहेत, अनेक ‘का-कसे-कोण-केव्हा विचारावेसे वाटतात, उपजीविकेचा आणि अस्तित्वचा विचार येतो, समूहाच्या मान्यतांचा आणि चालीरीतींचा प्रश्न येतो, भीती आणि आनंदाच्या स्त्रोताचा प्रश्न येतो, असलेल्या किंवा नसलेल्या साधनांचा विचार येतो, ओळख आणि सन्मानाचा विचार येतो, अव्हेरलेपणाचे आणि दुर्लक्षित राहिल्याचे कढ येतात, वापर करून घेत असल्याच शल्य येत… या आणि अशा असंख्य प्रश्नाचं मोहोळ उठत. ते माहिती करून घेण्याची जिज्ञासा होते. आणि गंगाचा एकच आदिवासी समूह नाही. भारतात दफ्तरी नोंद झालेले आदिवासी समूह ७०० च्या वर आहेत. केवळ PVTG म्हणजे विशेषतः असुरक्षित आदिवासी गट ७५ आहेत (पूर्वी या गटांना primitive tribe म्हणजे आदिम आदिवासी असे म्हणायचे). या शिवाय भटक्या विमुक्त समूहाची यादी (केवळ महाराष्ट्रात ४२ भटके-विमुक्त समूह आहेत). शिवाय scheduled castes आहेत, अन्य-मागासवर्गीय आहेत, धर्मावर आधारलेले गट आहेत,… प्रत्येकाचा कॉन्टेक्स्ट वेगळा, जीवनपद्धती वेगळ्या, प्रश्न वेगळे, अग्रक्रम वेगळे. त्यांना समजून घेणे म्हणजे त्यांच्या कॉन्टेक्स्टचा जास्तीतजास्त पट समजून घेणे. लैगिक-पसंतीच वेगळेपण, पारलिंगी व्यक्ती यांच्या प्रश्नांची चर्चा सुद्धा स्त्री-चळवळीत उशिरा सुरु झाली. कोणत्याही व्यक्तीला फक्त तिच्या घराच्या एवढ्याशा खिडकीतून अथांग विविधतेचा पट कसा दिसणार, कसा समजणार हा प्रश्न महत्वाचा.

( बंदी नको संधी हवी )
ग्रासरुट्स फेमिनिझमच्या एका लेखात एकात एक चपखल बसणाऱ्या लाकडी बाहुल्याच्या खेळण्याचं उदाहरण दिल होत. वरची बाहुली उघडली की आत दुसरी बाहुली. तरी ह्या खेळण्यात बाहुल्यांचे केवळ पाच-सहा थर असतात. विचार करा, आपल्याकडे जातीची बाहुली उघडली, तर तिच्या पोटातच असलेल्या जाती-स्त्रीयांना पोटजातीच्या अगणित बाहुल्या उलगडतात. धर्माची बाहुली उघडली की त्यांच्या शाखाच्या असंख्य बाहुल्या बाहेर. लिंगभाव, शारीरिक क्षमता, शिक्षण, रहिवास (शहरी-ग्रामीण-गावकुसाबाहेर-जंगल), कुटुंबातील नातेसंबंध (विधवा-परित्यक्ता- घटस्फोटीत-अविवाहित वगेरे) अशा अनेक बाहुल्यांची जंत्रीच आहे

. प्रत्येकामध्ये आपसात उच्च-नीच मान्यता आणि सत्तासंबंध आणि दमनाचा व्यवहार. बाहुली जेवढी आत, तेवढी जास्ती गुदमरलेली, घुसमटलेली. कोणत्याही स्त्रीला तिच्या कोंटेक्स्त सहित समजण हा मोठा आणि कष्टाचा अभ्यास वाटतो. ही सगळी विविधता स्त्री- चळवळीच्या आलिंगनात सामावली जाण्याची निकड वाटत होती. कारण हा समावेशच स्त्री-चळवळीला अधिक सघन, संपृक्त करणारा आहे याची खात्री पटलेली होती. म्हणूनच ग्रासरुट्स फेमिनिजम , त्यातल्या बदलाच्या धुमाऱ्यांची स्वतंत्र मांडणी, आणि चर्चा आवश्यक वाटली.
चळवळी पासून लांब राहिलेल्या, किंवा लांब ठेवल्या गेलेल्या मैत्रिणी हळूहळू बदलाच्या प्रवाहात येताना दीसत होत्या. त्यांच उमलणारे आत्मभान, नवजाणीवा जाणवत होत्या. गरिबी, जाती-धर्म यामुळे कुटुंबाची होणारी ससेहोलपट संभाळताना,स्वतःच्या शरीराचे, अस्मितेचे प्रश्न पडायची फुरसतचं काही जणांना मिळाली नव्हती / नाही. आज अशा मैत्रीणीना वेगळे प्रश्न पडत आहेत, त्याची उकल करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. स्त्रियांच्या नवीन आकांक्षाचे, हक्काचे, आत्मभानाचे आवर्तन ग्रासरुट्स मध्ये जाणवत आहे.
( तुम साथ हो तो.. अस एकेकाळी म्हणणारी अंजुम शेक आता तिच्याबद्दल ते बोलते जाते )
उपेक्षित समाजातल्या स्त्रियांच्या अस्मितेचे, त्यांच्या हक्काचे, जातीमुळे होणार्या कुचंबणेचे प्रश्न आत्ता ऐरणीवर येत आहेत. या प्रश्नांमुळे घायाळ झालेल्या स्त्रियाचं , आत्मविश्वासाने आणि पद्धतशीरपणे ते मांडत आहेत आणि तडीसही नेत आहेत. स्वताच्या जाती-जमातीतील अनिष्ट चालीरीती बद्दलही त्यांचा विरोध आहे. एक प्रकारे स्त्रीचळवळीतली दरी सांधली जातेय.आपल्या समाजात जेवढी विविधता आहे, तेवढीच सत्ता संबंधांची आणि विषमतेची उतरंड आहे. ताकतवार (वर्ग,जाती, पुरुष) आपली सत्ता लाद्तातचं ,पण ग्रासरुट्स मध्येही अंतर्गत सत्तेची उतरंड आणि स्वार्थी हितसंबंधाची स्पष्ट रचना आहे. आणि तिथेही सगळ्यांच्या तळात स्त्रिया आणि पारलिंगी आहेत.

( मसुरी डायरीतून आयएस अकॅडेमी ला प्रशिक्षण घेलतासाठी निघालेली रसिक मारगाये )
ग्रासरुट्स फेमिनिझम हा उपेक्षित समाजातल्या स्त्रियांच्या बदलाचा प्रवास आहे. हा बदल छोटा की मोठा हा मुद्दा नाही, या मैत्रिणी करत असलेले काम छोटे की देदीप्यमान हाही मुद्दा नाही. स्वतःबद्दल झालेल नवं आकलन त्या पुढे कसे नेत आहेत, आपली ताकत इतरांशी कशी जोडत आहेत हे महत्वाचे आहे.स्त्रीयांना

( मेळघाटची वाघीण गंगा जावरकर )
स्त्री-चळवळीचेच पण अधिकचे कंगोरे स्त्री -चळवळ प्रत्येक स्त्रिच्या मुक्तीचा ध्यास घेतलेली राजकीय चळवळ आहे. हक्कासाठी, मूल्यांसाठी लढणारी आहे. स्त्रियांनी स्वतःबद्दल विचार करणे, आपल्याला काय वाटते ते सांगणे, बोलणे, करणे, हेच पुरूषसत्तेला आव्हान वाटते. आपल दमन करणार्यांना, सत्ता गाजवणारयाना प्रश्न करण, आव्हान देण हे स्त्री चळवळीचे व्यवछेदक लक्षण आहे. लैंगिकता , गतिशीलता (mobilty ) यावर पाबंदी, करकच्चून आवळलेली आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय नाकेबंदी ही स्त्रियांच्या दमनाची मुख्य अस्त्र. कुठे जायचे, कस जायचे, कोणाबरोबर जायचे? काय करायचे , किती हसायचे,भावना आणि शारीरिक आनंद व्यक्त होणार नाही याची खबरदारी कशी घ्यायची ह्या सगळ्याचं बाळकडू लहानपणापासून मिळतेच. नवऱ्याला सर्वस्व अर्पण करण्याचे धडेही गिरवून घेतले जातात. शरीराच नखही उघडकरू न देण्यात स्त्रीत्व दडलेले असल्याच सारख पक्क केल जात. आणि त्याच स्त्रीला, तिला न विचारता, अगदी अनोळखी माणसाशी लग्न लावून देऊन तीने पहिल्याच रात्री त्याला सर्वस्व अर्पण कराव अशी अमानवी अपेक्षा केली जाते. असल्या अनेक अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या स्त्रीला शिक्षा देऊन जरब कायम केली जाते. खाजगी आणि सार्वजनिक परीघाची कडक विभागणी हे आणखीन एक अस्त्र. त्यामुळे घरगुती कामाचे अवमूल्यन झाले. स्वावलंबन, अर्थार्जन, राजकीय सहभाग यापासून स्त्रिया लांब राहिल्या. रोजच्या व्यवहारात सुद्धा ‘आपल्याकडे कोणी बघणार नाही, आपल्यावर कोणी प्रेम करणार नाही’ याची जबाबदारी स्त्रीवर’ आणि ‘ती कुणाकडे बघणार नाही, कोणावर प्रेम करणार नाही’ याची जबाबदारी पण तिच्यावरच. सतत या दबावाखाली वागायला लावण्यातली मानसिक हिंसा लक्षात येत नाही. त्यांच्याबद्दल आपण जास्ती बोलत नाही. मातृसत्ताकाची पार्श्वभूमी असलेल्या आदिवासी, भटक्या समूहात लैगीक्तेभोवती अन्य समूहासारखे taboo नाहीत. पण तिथेही ‘समुहांतर्गत’ लैगिक संबंध आणि ‘समूहाबाहेर’ लैगिक संबंध याच्या सीमारेषा आणि स्त्रियांसाठी त्याच्या शिक्षेचा सरावलेला कायदा (customary law) आहेच. समूहाबाहेरचे संबंध ‘उच्च’ जातीतल्याशी आहेत की समूहाच्या पेक्षा ‘नीच्च ’ जातीतल्याशी आहेत यावरून ही शिक्षा द्यायची की नाही काय द्यायची हे ठरते.
ग्रासरुट्समध्ये आत्मभानाची लहर
पराकाष्ठेची घरेलू हिंसा सहन करत लग्न टिकवून ठेवणारया अन्वरी खान, अंजुम शेख, कांता शिंदे, शीला पवार सारख्या वेगवेगळ्या ग्रासरुट्स समूहातून येणाऱ्या हजारो मैत्रिणी हे जोखड झुगारून देतात याचा अर्थ काय? मातंग म्हणून अवहेलना सहन करून दबून गेलेली विनया घेवदे , ‘माझ्या जातीचे भय आता मला वाटत नाही’ अस म्हणते याचा अर्थ काय? सायमा शेख ही १९ वर्षाची मैत्रीण लैंगिक क्रीयेबद्दल (लैंगिकता नव्हे) स्त्रियांना काय वाटत, आवडते याबद्दल फिल्म करते आणि तिची ४० वर्षाची आई यास्मीन ती फिल्म का आवडली आणि महत्वाची आहे असं जाहीर सांगते याचा अर्थ काय? जया कुरणे, हेमलता पाडवी, सुषमा मोहुर्ले यांच्यासारख्या शेकडो मैत्रिणी ग्रामपंचायत, पंचायत समिती वर निवडून येऊन, सरपंच-अध्यक्ष होऊन, समर्थपणे कारभार हाताळतात याचा अर्थ काय? —- सारख्या हजारो मैत्रिणी शासकीय अधिकार्यांना हिशेब मागून, गावातल्या कामाच्या गुणवत्तेबाबत जाब विचारतात याचा अर्थ काय? शालू कोल्हे, सरिता मेश्राम, कविता मेश्राम सारख्या धीवर समूहातल्या मैत्रिणी तलावातील जैवविविधता नष्ट करणारी ‘बेशरमी’ ही वनस्पती काढण्याचे काम मनरेगा योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासनाशी वकालत करतात याचा अर्थ काय? ‘हथाई’ (चावडी) समोरून स्त्रीयांना चालण्यास सुद्धा मनाई असताना, राजस्थानची सुनिता रावत स्कुटीवरून दीमाखात इतर महिलांना डबलसीट घेऊन हथाई समोरून जाते, याचा अर्थ काय? पाठींबा म्हणजे ‘आपल्याला मनापासून वाटणाऱ्या गोष्टी करण्यासाठी मिळणारे बळ’ अस पल्लवी पालव म्हणते याचा अर्थ काय? किंवा ‘empowerment हा शब्द मला आमचा वाटत नाही. Empowerment म्हणजे एक देण्या-घेण्याचे गाठोडे असल्यासारखे वाटते म्हणून मी हा शब्द वापरत नाही’ अस मुमताज शेख म्हणते याचा अर्थ काय?
अनिता कांबळे या मैत्रिणीची आई. न-शिकलेली, विटभट्टीवर काम करणारी, दोन मुली पदरात सोडून नवर्याने ‘टाकून’ दिलेली. अनिता लहान असताना तिला अकारण, अप्रस्तुत गोंजारणार्या नातेवाईकाला ‘माझ्या मुलीला हात लाऊ नका’ अस खमकेपणाने सांगणारी ही स्त्री काय सांगते? द्वारका पवार ही पारधी समूहातली मैत्रीण. निटनेटक राहत असल्यामुळे तिच्यावर शरीरविक्रय करण्याचा गुन्हा लावून समूहाने तिला ‘इमान जाळायला’ लावले. ही पारधी समूहात दिली जाणारी एक शिक्षा आहे. लालभडक तापवलेले कुरहाडीच पात पिंपळाच्या मोजक्या पानावर हातात ठेऊन, सांगितलेले अंतर चालावे लागते. शिक्षा भोगूनही द्वारका पालापालावर फिरत पारधी स्त्रियांना नीटनेटकं राहण्याचे महत्व पटवते याचा अर्थ काय? ग्रासरुट्स मैत्रिणींबरोबरच्या सह्प्रवासातून वेगळे शरीरभान आलेली आणि स्वताबद्दल कणखर निर्णय घेतलेली उच्चवर्णीय सुजाता खांडेकर ग्रासरूट्स फेमिनजम कोणत वैशिष्ट्य अधोरेखित करते? अशा बदलांची एक जबरदस्त लहर सतत दिसते, जाणवते. ही लहर कुटुंब, समूह, शासन, बाजार, माध्यम अशा सर्व परीघाना स्पर्श करते. दिसणाऱ्या ह्या बदलांमागे न दिसणाऱ्या असंख्य छोट्या छोट्या बदलाच्या गोष्टी आहेत ज्या संपूर्ण चळवळीलाच समृद्ध करत आहेत. ग्रासरुट्स मधल्या मोठ्या छोट्या प्रक्रीयेंचा पोत, स्वरूप, उकल वेगळे आहेत, कारण त्या ग्रासरुट्स कोनतेक्स्त आणि वास्तव यात रुळलेल्या आणि रुतलेल्या आहेत. हे सगळ घडताना, अविभाज्यपणे, जैविकपणे मैत्रिणी स्वतःचे अनुभव आणि कृती एकमेकांना सांगून चळवळीला धार आणत होत्या. ‘पर्सनल इज पॉलिटिकल ’ हे त्यांना कस कळल? का ते कळत होतच, फक्त करण्याची आणि म्हणण्याची संधी मिळाली नव्हती ? ग्रासरुट्स फेमिनीजम असा अविष्कार आहे.
स्त्रियांची आंतरिक ताकत
स्त्री-चळवळीने कायम संघटीत शक्तीतून (power with) बदल घडवण्याला (power to change) केंद्रस्थानी ठेवल. बदल घडवण्यासाठी संघटीत शक्ती हवीच. पण स्त्री चळवळीने स्त्र्रेयांच्या आंतरिक शक्तीकडे (power within) जवळजवळ दुर्लक्ष केल. खरतर स्त्री चळवळीतील प्रत्येकाचा प्रवासच आत्मभानाचा प्रवास आहे. स्वतः बद्दलच्या ओळखीच्या बदलातून,त्याच्या जाणवलेल्या परिणामातून स्वताच्या नजरेत स्वताबद्दल प्रेम, सन्मान वाटायला लागतो. ग्रास्सृत्स फेमिनिझम सदरातल्या सगळ्याजणी वेगवेगळ्या शब्दात पण हेच सांगतात. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या समूहातल्या मैत्रिणी ‘मला स्वताला भेटवल, ताकत दिली’ किंवा ‘माणूस म्हणून घडत होते, मलाच समजून घेत होते’ किंवा ‘माझ्या दुखाने मला बाइचा विचार करायला शिकवलं’ किंवा ‘मेरा डरही निकल गया’ अस सांगतात तेव्हा त्या आत्मभानाविषयीच बोलतात. मला स्वतःलाही भगिनीभावाचा खरा अर्थ या प्रक्रीयेतच समजला.

( सुषमा मोहुरले वहनहक्कासाठी ग्रामसभा फेडरेशनचे नेतृत्व )
आपल लहानपण, आणि पौगंडावस्था आठवायचा प्रयत्न करू या. काय सांगितलं जात होत आपल्यायला? अमुक करू नको, तमुकच कर. अमुक तुला जमणारच नाही, तमुक तुझच काम आहे. अमुक करण्याची तुझी लायकी नाही, तमुक करण्यास तू बाध्य आहेस, अमुक केले तर तुला शिक्षा होईल, तमुक केले तर तुझ कौतुक होईल… हे अमुक आणि तमुक काय आहे ते आठवूया. वर घराची इज्जत, तुझ शील म्हणजे काचेच भांड, तू असुरक्षित त्यामुळे तुझ्या रक्षणाची जबाबदारी आमची, तू बाहेरच न पडण हा सुरक्षेचा उत्तम मार्ग…. आणि नवऱ्याचे सुख हे सुरुवातीपासून आणि अंतिमतः तुझ कर्तव्य असायला हवं — या आणि अशा धोशामुळे मुली आणि स्त्रिया स्वतःला खरोखरच कमकुवत मानायला सुरुवात करतात. त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. तो खच्चीही केला जातो. मग चूक-बरोबर, नैतिक- अनैतिक, पाप-पुण्य, चारीत्र्यशील-चारीत्र्यहीन अशी लेबल असलेल्या अनेक रूढीपरंपरा, रीतीभाती यांची योजना करून स्त्रीमधलं नैसर्गिक मानव्य विझवण्याचा प्रयत्न होत असतो. या बाळकडूच ओझ स्त्रिया आयुष्यभर नेटाने वागवतात. पण याचा अर्थ तिच्या इच्छां, आनंद, आकांक्षा, मन हे मरत नाही, त्यावर फकत राख चढते हे कामातून लक्षात आल. राखेखाली हे काही प्रमाणात जिवंत असत. प्रेमाची, ज्ञानाची , धैर्याची, फुंकर कुणी घातली तर राखेखालचे निखारे फुलून उठू शकतात. राखेखालच्या तिच्या ताकतीला, माणुसपणाला आम्ही ‘आंतरिक ताकत’ (power within) म्हणतो.म्हणून स्त्रियांच्या मुक्तीसाठी करायचे प्रयत्न, सर्व अडथळे पार करून, या विझत चाललेल्या आंतरिक ताकदी पर्यंत पोहोचण्याइतके समर्थ असले पाहिजेत अशी आमची धारणा आहे.
आंतरिक ताकदी पर्यंत न पोहोचता, वरवरच्या प्रयत्नातून बदलाचे आभास तयार करता येतील पण बदल नाही होणार.दुर्दैवाने आज आभास तयार करण्याला मान्यता आणि प्रतीष्ठाही मिळते कारण हे आभास संख्यात्मक रीतीने मोजता येतात. मोजता न येणाऱ्या गोष्टी एकतर अस्तित्वाचं नाहीत किंवा महत्वाच्या नाहीत हा समज स्त्री प्रश्नांवर काम करण्यासाठी निधी देणाऱ्या संस्थांनी रूढ केला आहे. दुर्दैवाने अनेकजण याला बळी पडले किंवा त्यांनी या समजाला मूकसंमती दिली. बचत गटात इतक्या स्त्रिया, आरोग्यकेंद्रात येणाऱ्या इतक्या स्त्रिया, शाळेत दाखल झालेल्या इतक्या मुली वगैरे यात स्त्रियांच्या क्षमतेची मोजदाद सुरु झाली. स्त्रिया किंवा मुली घराबाहेर पडायला लागल्या की मुक्तीच्या कामाची सुरुवात होऊ शकते. त्यालाच स्त्रियांचं सक्षमीकरण मानण्याची चूक करता कामा नये. बचतगटात येणाऱ्या आणि चोख आर्थिक व्यवहार ठेवणाऱ्या मैत्रिणी कुटुंबात किंवा समूहात आपल मत, विरोध, व्यक्त करू शकतात का,आव्हान करायला धजावत आहेत का? असे प्रश्न पडायला हवेत.

(कोरकू समूहाचे नेतृत्व कारणारी सरपंच गंगा जावरकर )
ग्रासरुट्स मधल्या मैत्रिणींसाठी तर अडथळ्यांची शर्यंत आणखीनच अनेक थरांची (layered) आणि गुंतागुंतीची आहे. दारिद्र्य, जात, यांचा संबंध आहेच. जगात घडणाऱ्या सकारात्मक बदलाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रदीर्घ विलंब आहे. आणि त्यांच्या अवहेलनेला, त्याचं अस्तीत्व नाकारण्याला असलेली घाऊक सामाजिक मान्यता आहे. स्त्री चलवळीतही अनेक वेळा त्यांच्या बरोबरचे काम हे प्रदर्शनीय सदरात मोडते. म्हणूनच ग्रासरूट्स फेमिनिजमची स्वतंत्र मांडणी स्त्री चळवळीच्या दृष्टीनेही गरजेची ठरते.
ग्रासरुट्स आणि ब्रूहत (macro) रचनात्मक बदल यांचा संबंध काय?
ग्रासरुट्स मधला बदल आणि रचनात्मक (structural) बदल यात काय संबंध आहे असा प्रश्न नेहमी विचारला जातो. ग्रासरुट्स फेमिनिस्म सदरातल्या ‘मन झिम्माड झाल’ या लेखातील अनिता, ‘उपजिविकेशी जोडलेले आत्मभान’ या लेखातील कांता या प्रवासाच्या साक्षीदार आहेत. २०१४ साली ग्रासरुट्स नेतृत्व विकासाच्या प्रक्रियेतून गेलेल्या मराठवाड्यातील २७ एकल (त्यांचाच शब्द) मैत्रीणीना एकल महिलांच्या प्रश्नासाठी संघटना बांधण्याची प्रेरणा मिळाली.अनिता, कांता या प्रक्रियेत पुढाकाराने आहेत. अनेक मैत्रिणी निरक्षर असूनही लिहिता-वाचता येणाऱ्या सोबत्यांना बरोबर घेऊन गावोगावी जाऊन एकल महिलांच सर्वेक्षण केल. संघटनेच्या कामाचे अग्रक्रम ठरले, रचना ठरली, आणि जीवतोड मेहनत करून काम सुरु झाले. कधीही, काहीच न बोलता आल्याने मुस्कटदाबी झालेल्या असंख्य एकल स्त्रिया सहज जोडल्या गेल्या. आज या ‘एकल महिला संघटन’चे २२००० पेक्षा अधिक सभासद मराठवाड्याच्या केवळ ४ जिल्ह्यांमध्ये आहेत. एकलच नव्हे तर कोणत्याही स्त्रियांवर होणार्या अन्याय, अत्याचाराबद्दल मदत करणारे एक जबरदस्त कार्यपीठ त्यांनी तयार केले आहे. एकल महिलांच्या संपत्ती अधिकार, त्यांच्या बद्दल असलेला सांस्कृतिक आकस,कलंक (stigma) आणि घृणा या विरोधात जोरदार काम सुरु आहे. विधवा झालेल्या स्त्रीचे नवऱ्याच्या अंत्यविधीच्या वेळीच ‘विधवा स्त्रीकडूनच’ दागिने काढून घेण्याच्या, बांगड्या फोडण्याच्या अमानवी प्रथेला संघटनेच्या विधवा महिला विरोध करत आहेत. नातेवाईकांचा, गावातल्या प्रतिष्ठितांचा विरोध पत्त्करून, जीवाचा धोका पत्करून या मैत्रिणी ही प्रथा मोडीत काढून सांस्कृतिक मान्यताना छेद देत आहेत. गावागावातून हळदीकुंकू सारख्या समारंभामध्ये यापूर्वी प्रवेश वर्ज्य असलेल्या मैत्रिणी, गजरे माळून, दागिने घालून समारंभामध्ये मनस्वी सहभागी होत आहेत. थीएटरमध्ये जाऊन या मैत्रिणी सिनेमा बघतात, गटाने हॉटेल मध्ये जाऊन जेवतात, नेहमी एकत्र बस करून ट्रीपला जातात, नाचतात, गाणी म्हणतात. स्वताची पतपेढी काढून आर्थिक बाबतीत स्वावलंबी होण्याचे प्रयत्न करीत आहेत. यातल्या अनेक मैत्रिणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवून, जिंकून आल्या. अनेकजणी सरपंचही झाल्या. आपल्या गावाचे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून विकास, सुविधा यांचे नियोजन त्या करत आहेत, तिथेही पुरुषी मनोवृत्तीशी झगडत आहेत. या प्रवासात पारलिंगी मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. हळूहळू एकल महिलांकडे पाहण्याची तिथल्या लोंकाची दृष्टी बदलत आहे.संरचनात्मक बदलाची आणखी काय मानक आहेत? ग्रासरुट्समध्ये होणारे हे बदल सार्वत्रिक करण्याची जबाबदारी कोणाची?
ग्रासरुट्स ज्ञान निर्मिती
स्त्री-प्रश्नावरचा कृतीकार्यक्रमच नव्हे तर प्रश्नांची मांडणी, सिद्धांतिकरण हे स्त्री-चळवळीच महत्वाच आयाम आहे. अनेकदा लक्षात येत होत की ग्रासरुट्सच्या या मैत्रिणी त्यांच्या जीवनानुभवावर आधारित सिद्धांतिकरण करत आहेत. पण ते मौखिक आहे, आणि प्रमाण भाषेत नाही. अस्ताव्यस्त आहे, तिच्यात मांडणीची शिस्त नाही. मुख्यतः ती प्रक्रिया छोट्या गटात होणार्या आंतरिक चर्चेच्या रिंगणात आहे. म्हणून पूर्णपने दुर्लक्षित आहे. समाजमान्य भाषेत (विशेषतः इंग्रजीत), सुंदर, सुबक मांडता येण हा केवळ औपचारिक शिक्षणाची संधी मिळाल्याचा परिपाक आहे हे लक्षात घेतलं की या दुर्लक्षाच विशेष दुख होत. व्यक्तीच सामाजिक स्थान त्याच्या आयुष्याला आकार देत. व्यक्तीची मान्यता, सन्मान ही तिच्या जात, धर्म, पंथ, त्यांची समाजमान्यता, नीतीनियम, आर्थिक परिस्थिती, यावर ठरवली जाते. त्यावरच आपल्या वाट्याला संधींचा समुद्र येणार की अव्हेलना आणि नकार हे ठरत. ग्रासरूट्स महिलांच्या अनुभावावर ‘त्यांच्या वतीने’ बोलणे, मांडणे खूप होत होते. त्यांच्या‘वर’ आणि त्यांच्या‘बद्दल’ संशोधन झाले. पण त्यांच्या‘बरोबर’ संशोधन झाले नाही. त्यांची भूमिका ‘माहितीचा (DATA ) स्त्रोत’ इतकीच सीमित राहिली. या महिलांना ज्ञान धारक म्हणून मान्यता नाही. ज्ञानाचे क्षेत्र फार बंदिस्त आहे. याचाही संबंध बाहुलीच्या आतल्या बाहुलीच्या घुसमटीशी आहे. जितकी बाहुली आत
तितकी तिच्या विचारांची, कृतीची, ज्ञानाची , शहाणपणाची, अस्मितेची आणि अस्तित्वाची किंमत कमी. माणसाला किंमत नाही म्हणून त्याच्या ज्ञानालाही किंमत नाही. मग आपसूकच ज्यांना किंमत आहे, ज्यांच्याकडे power आहे, त्यांचा विचारच ज्ञान, त्यांची मांडणीच सिद्धांत, आणि तेचज्ञानी . ग्रासरुट्स मधल्या मैत्रिणींचा सगळा विचार, व्यवहार त्यांच्या जगण्याच्या रिती आणि अनुभवात स्थिरावला आहे. विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आकलनाच्या (ways of knowing ) पद्धती वेगळ्या आहेत. व्यक्त होण्याच्या, विश्लेषणाच्या, एखाद्या प्रक्रियेला जोडून घेण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. ते समजून घेता आल नाही तर, दोष ते न समजणाऱ्या, किंवा समजून घेण्याची इच्छा नसणाऱ्यांच्या असू शकतो ना? ज्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी शाळेच दर्शनही घेतलं नाही (हे ही बाहुल्यांच्या घुसमटीचं लक्षण), त्यांनी द्यान मात्र समाजाने विशेषाधिकार बहाल केलेल्यांच्या मापदंडाच्या मर्यादेतच करायचे ही रीत कशी? असें प्रश्न पडायचे. ज्यांच्या अनुभवावर संशोधन झाली, त्यांची नावसुद्धा या प्रक्रियेत अभावानेच नोंद झाली. अस कस? यातून लक्षात आल की ज्ञान म्हणजे काय? ग्यान निर्मितीचा हक्क कोणाला आहे? कोणावर विश्वास ठेवला जातो? कोणाच खर मानल जात? आणि हे असंच का? असे तात्विक चिंतनाचे प्रश्न महत्वाचे ठरले. ग्रासरूट्स मैत्रिणी काही महत्वाचे मांडतील तर त्याची वर्गवारी अनुभव, व्यवहार, व्विश्वास (belief) अशामध्ये होते. ज्ञान म्हणजे काय? केवळ सुबक भाषेतली मांडणी? सुंदर सादरीकरण? की समाज आणि समाज-प्रक्रियांच साधार व्यक्त झालेलं भान? ग्रासरुट्स मधल्या या भानाच, द्यानाचे ‘लेखकत्व’ कोणाकडे असायला हवे?
वैचारिक प्रेरणा
स्त्री-चळवळीत काम करताना सुरुवातीपासून सावित्री आणि जोतीबा फुले यांच्या विचार, कृतीने स्तिमित झाले होते. प्रचंड प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. वंचितसमूहा बरोबर काम करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजायला लागले. स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास करताना ‘Black Feminism’ चा परिचय झाला होता. स्त्री चळवळीतल्या याखंबीर, निष्ठावान, आणि जीवनातल्या अनुभवसमृद्ध मैत्रिणींची समज आणि मांडणी विचारप्रवर्तक वाटली. बौद्धिक, मानसिक, सह-अनुभूतीच्या आणि इतर अनेक पटलांवर ही समज जिवाभावाची वाटत होती. ग्रासरुट्स मैत्रिणींबरोबर काम करताना येणाऱ्या अनुभवांकडे बघण्याची दृष्टी त्यांनी दिली. त्याबरोबरच नित्यनवीन आणि समृद्ध करणाऱ्या अनुभवांच्या निकषावर ‘Black Feminism’चा पट आपल्यासाठी विस्तृत करण्याची सवयही लागली. शर्मिला रेगेंच्या दलित फेमिनिझम च्या मांडणीने ‘Black Feminism’शी अधिक नाळ जोडायला मदत केली. Gail Omvedt च्या लिखाणाने आणखी समृद्ध केल. अनेक ग्रास्सृत्स महिलांची आत्मचरित्र वाचली. त्यांची भाषांतरे, विश्लेषण झाली होती. आत्मचरित्र लिहिण्याची ह्या लेखिकांची ही कृतीच महान बंडखोरीची आहे. या आत्मचरीत्रांमध्ये ग्रासरूट्स स्त्रीयांना उभारी देण्याची, विचारशील आणि कृतीशील बनवण्याची ताकत आहे हे जाणवत होत. अशा अनेक संसाधनानी जाणीवा, चिंतन, विचार समृद्ध केले. यानिमित्ताने झालेल्या चर्चांमधून हे चिंतन आणि विचार सहकारी मैत्रिणीं बरोबर सामायिक करण्याच अवकाश (space) तयार झाले.
अशी विचारप्रवण संसाधन केवळ अभ्यासक्रमापुरती (अकॅडेमिक) किंवा पुस्तकी राहता कामा नये. हे आणि असं लिखाण ज्यांच्या बद्दल, ज्यांच्या बाजूने आहे त्यांच्या पर्यंत ते पोहोचायलाच हव. त्यांना ते समजून घेता यायला हव . त्यांनी त्यावर भाष्य कराव. त्याचा उपयोग आपल जीवनमान सुधारण्यासाठी वापराव. आणि मुख्य म्हणजे त्यात भर घालण्याची क्षमता आणि धैर्य त्यांना मिळायला हव. याच्या बरोबरच ग्रास्सृत्स मधल्याच अनेक समूहातून आलेल्या महिलांनी एकमेकांशी संवाद साधण्याचे महत्व अधोरेखित होत होते. औपचारिक गयाना निर्मितीच्या संस्था/ संसाधने आणि ग्रासरूट्स वास्तव यांच्या दरम्यान पूल बांधण्याचे काम करावे लागेल. ग्रासरुट्स फेमिनिझ्मचा प्रवासात याला महत्व आहे. अशा प्रयत्नातून फेमिनिजम बद्दल ग्रासरूट्स मैत्रिणींमध्ये असलेली अनभिज्ञता , तुटलेपण, भीती जाऊन, स्त्रीचळवळीशी सांधा जोडण्याच काम होईल. यामुळे वंचितांची चळवळ, स्त्री-चळवळ सशकत, प्रवाही होईल हा विश्वास आहे.
सह–निर्मितीचा एक प्रयोग
आपल्याला आपल्या सामाजिक स्थानामुळे मिळालेले विशेषाधिकार आणि संधी याच प्रामाणिक भान आल आणि आपणच आपल्याला चीकटवलेली पिसं एकेक करून गळायला लागली की आपले विशेषाधिकार इतरांबरोबर वाटून घेण्याची एक मानवीय निकड तयार होत असणार. वस्तीतल्या मैत्रिणींचे अनुभव, द्यान, कौशल्य एकत्र वापरून नवीनच सहनीर्मितीची आस यातून तयार झाली. या सगळ्या प्रक्रियेत एकमेकांचा वैचारिक आणि मानसिक आधार, केलेला सहप्रवास, त्यातून एकत्रित आलेल समृद्धपण आणि शहाणपण ही प्रेरणा ठरली. स्त्री-सक्षमिकरणाचा अर्थ लावण्याचे एक academic संशोधन आम्ही ८ सहसंशोधकानी मिळून केले. मी त्यात संशोधन-सूत्रधारही होते आणि सह-संशोधकही. संशोधनाच्या परीघामधील अनेक मान्यता मोडीत काढणारा हा प्रयोग आणि अनुभव होता. दीर्घ काळाच्या सहप्रवासाचा, सहनीर्माणाचा हा परिपाक आहे. एक वेगळे वास्तव समोर मांडण्यासाठी मिळून घातलेला घाट आहे. आपण सर्व एकाच नावेचे प्रवासी असल्याची जाणीव त्यात होती. आम्हा सगळ्यांचीच आयुष्य उघड्या पुस्तकासारखी एकमेकांना उपलब्ध आहेत. आणि ती नातेसंबंध घट्टच करत आहेत. प्रचलित संशोधन पद्धतीमध्ये सुत्रधाराशिवाय सर्वांनी निनावी राहण्याचा प्रघात आहे. आमच्या सर्वांच्या आयुष्याच्या अत्यंत खाजगी, वेदनामय बाबी या संशोधनाचा गाभा होत्या. मिळालेल्या सुरक्षित अवकाशामुळे त्या आम्ही एकमेकाबरोबर सहज वाटून घेतल्या होत्या. प्रबंधामध्ये कोणीही निनावी असू नये, सर्वांच्या नावानी त्यांच्या आयुष्यातील घटनांचे विश्लेषण व्हावे असा आग्रह सर्व सह्संशोधकांनी धरला. आम्ही केलेही तसेच. स्त्रीवादी चळवळीने स्त्रियांच्या संशोधनाबाबत काही आग्रह धरले. स्त्रियांचे भावविश्व, दृष्टीकोन, अनुभव, विचार करण्याच्या पद्धती, समजून घेण्याच्या-देण्याच्या पद्धती, नाते संबंधांचा (human रिलेशनशिप) आग्रह, इतर परिसराशी आपला अनुभव जोडण्याची पद्धत- हे व्यक्तीनिष्ठ आहे त्यामुळे स्त्रीवादी संशोधनाचा व्यक्तिनिष्ठता (subjectivity) हा गाभा राहिला आहे. आपल्या अनुभवातून आपले अस्तित्व, ओळख भक्कम करण्याच्या प्रेरणेतून आमच्या सह्संशोधकानी निनावी न राहण्याचा निर्णय घेतला. त्यातले संभाव्य धोके ओळखले पण त्याला भीक घातली नाही. स्त्रीवादी चळवळीने स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल धरलेल्या आग्रहात हे एक पुढच पूल नक्की होत. आपल्यातल्या समाजनिर्मित भिंती
वितळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा तर भगीनिभावाचा अर्थ आहे.ग्रासरूट्स स्त्रियांच्या (जी गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत आहे तीच, अन्य वंचित समूहाबतीतही खरी आहे) ज्ञान निर्मितीची प्रक्रिया सघन आणि प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सर्वजणी/सर्वजण अत्त दीप अकादमी म्हणून संस्थात्मक काम करत आहोत. याबद्दल नंतर सविस्तर लिहिणार आहे.आमच्या संशोधनाच्या वेळी चर्चा करताना मुमताजने मांडलेले मत महत्वाचे वाटते. ती म्हणाली होती, ‘आपण कोणत्याही दुसर्याने, बाहेरून केलेल्या मांडणीला बळी न पडता, आपल्याला काय वाटत, काय समजले, काय सांगायचं आहे, यालाच महत्व दिले आहे. दुसर्यांच्या थेअरी मध्ये आपल्याला फीट करण्या ऐवजी, आपण आपल्याला पाहिजे तेच, तसच इतरांना दाखवतो आहोत आणि हा या रीसर्चचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे’. हे मत ग्रासरूट्स मैत्रिणींना ज्ञान निर्मितीच्या परीघाबद्दल काय वाटत, आणि काय असायला पाहिजे असे वाटतं , तेच दर्शवत.
ऑड्री लोर्डे अमेरिकन लेखिका, प्राध्यापिका, तत्वज्ञ, समलिंगी, कृष्णवर्णीय स्त्रीवादी, कवयित्री, आणि मानवअधिकाराच्या खंदया कार्यकर्त्या आहेत. ‘कोणत्याही जोखडातली स्त्री मुक्त व्हायची राहिली तर याचा अर्थ मी मुक्त नाही’, अस त्या मानतात. म्हणतात, “मी जर कोणत्याही दडपलेल्या स्त्रीयाना, माझेच दुसरे चेहरे म्हणून ओळखू शकले नाही तर मी त्या प्रत्येकीवर होणार्या जुलुमात भर टाकते आहे”. ग्रासरुट्स फेमिनिजम हा अर्थ आम्हाला लागतो. ग्रासरुट्स फेमिनिझम म्हणजे आत्मभानांचे नवनिर्माण आहे. आत्मभान अनेकार्थी जाणीवपूर्वक म्हटले ते अनेकजणीचे आणि अनेकांचे-एकत्रित या दोन्ही अर्थाने. इथे एकाच्या अस्मितेची जाणीव दुसर्याच्या अस्मितेचा कचरा करणारी नाही. एकाचा अधिक्रार दुसर्याच्या अधिकाराचे हनन करण्यासाठी नाही. उलट कोणतेही ठाम प्रतिपादन (assertion) करण्याची एकटीची ताकत तोकडी असल्याच्या समजेतून सहजपणे हा प्रवास एकत्रितपणे होत आहे. अशाच प्रक्रियेतून समानता, न्याय, स्वातंत्र्य, भगीनी/भ्रातृभाव ह्या मुल्यांची रुजवात नव्याने होईल असा विश्वास आहे. सध्यस्थितीत ही निर्णायक, महत्वाची गरज आहे.
( पूर्व प्रसिद्धी – मिळून साऱ्याजणी – दिवाळी अंक २०२५ )