सांगोला तहसीलच्या आवारात लतिकाने स्वच्छतागृहाची शोधाशोध सुरू केली . काही महिला कर्मचाऱ्यांना विचारले – “इथे महिलांसाठी स्वच्छतागृह कुठे आहे?”
त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसत म्हणाल्या, “आम्ही २५ वर्षं इथे काम करतोय, पण अजूनही आम्हाला वापरू शकू असे स्वच्छतागृह नाही. एक जुनं आहे त्या कोपऱ्यात, पण तिथे पुरुष जातात. त्यामुळे आम्ही ते वापरूच शकत नाही.”
कोरोची कार्यकर्ती , लतिका तोरणे कामासाठी, सांगोला तहसील कार्यालयात गेली होती. सरकारी कार्यालय म्हणजे नेहमीप्रमाणेच गर्दी, घाईगडबड आणि कागदपत्र घेऊन येणाऱ्या स्त्री -पुरुषांचे घोळके… काम करत असताना बऱ्यापैकी वेळ गेला आणि तिला जाणवलं, लघवीला जायचं आहे. शोधत शोधत ती बाहेर गेली , पण तिथल्या स्वच्छतागृहाचा दरवाजा बंद होता.
लतिकाला थोडं आश्चर्य वाटलं . तिने एका दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला विचारले तर ती म्हणाली, “ तुम्ही गेलात ते स्वच्छतागृह तर बंदच आहे. इथे महिलांसाठी दुसरी काहीच सोय नसल्यामुळे मला लंच ब्रेकला, लघवी करायला घरी जावे लागते. दुसरा काहीच पर्याय नाही.
त्या दिवशी लतिकाला स्वच्छतागृह शोधत आजूबाजूला फिरावं लागलं. तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला कुठेच महिलांसाठी स्वच्छतागृह नव्हतं. बस स्टँडवर जाऊन तिथलं स्वच्छतागृह वापरावं तर ते तहसील कार्यालयापासून २ किलोमीटर दूर होतं . लतिका अस्वस्थ झाली. तहसीलमध्ये कामासाठी येणाऱ्या बाकी महिलांना लघवीला जायची गरज पडल्यावर काय करतात असा प्रश्न तिला पडला. तिथे भेटलेल्या एका वयोवृद्ध महिलेनं सांगितलं, “काय करू बाई, इथले काम सोडून घरी जाता येत नाही. काहीजणी तर दूरदूरच्या गावातून आलेल्या असतात . काही महिला तर उघड्यावर बसतात. दुसरं काय करणार?”
महिलांशी संवाद झाल्यानंतर लतिका पंचायत समितीकडे गेली . तिथे गेल्यावर चौकशी केली, पण त्यांनी विचारलं, “तुम्ही आमच्या स्टाफमधल्या आहात का? “नाही, मी CORO मध्ये काम करते, आणि आता गरजेपोटी इथे आले आहे.” लतिकाने सांगितलं.
, “आम्ही बाहेरच्यांना आमचे स्वच्छतागृह वापरायला देत नाही. आमचा स्टाफ स्वतः पैसे भरून साफसफाई करतो.” हे उत्तर तिला ऐकायला मिळालं .
, “जर स्टाफ शिवाय तुम्ही कोणालाच स्वच्छतागृह वापरू देत नाही, तर सामान्य महिलांचं काय? या तहसीलमध्ये रोज अनेक महिला कागदपत्रं काढायला येतात. त्यांच्यासाठी काहीच सोई सुविधा नाहीत का? कामाची वाट पाहात थांबलेले असताना , लघवीला जायची गरज निर्माण झाली तर त्यांनी जायचं तरी कुठे ? ” लतिकाच्या प्रश्नावर कोणाकडे उत्तर नव्हतं .
शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून , त्यांना विंनती करून तिने चावी घेतली व पंचायत समितीच्या स्टाफचे स्वच्छतागृह वापरले .
तिच्यापुरता प्रश्न सुटला असला तरी , दररोज अनेक स्त्रिया इथे येतात. त्यांच्या मूलभूत गरजेचा, आरोग्याचा, सन्मानाचा विचार कोणी करणार की नाही? केवळ गरज आणि नाइलाजापोटी लघवीला जाण्यासारखी मूलभूत गरज त्यांना उघड्यावर बसून भागवावी लागणार का ? हा प्रश्न तिच्या मनातून काही केल्या जात नव्हता .
लतिका परत जाऊन तहसीलदारांना भेटली. तहसीलमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह असणे किती गरजेचे आहे यावर तिने निवेदन सादर केलं . तहसीलदारांनी ही संवेदनशीलपणे मुद्दा समजून घेतला व अजिबात वेळ न घालवता निर्णय घेतला. महिलांसाठी नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी बांधकाम विभागाकडे पत्र पाठवले.
निर्णय झाला असला तरी लतिकाला सातत्याने बांधकाम विभागाचा पाठपुरावा करावा लागला. अनेक महिला मानसिक पाठिंबा देत होत्या, त्यांना लतिकाचे म्हणणे ही पटत होते. पण आपली नावे निवेदन पत्रावर टाकणे त्यांना कठीण गेले. यापद्धतीने आपल्या मूलभूत गरजेसाठी आपण स्वत: निवेदन देऊ शकतो, प्रश्न विचारू शकतो हे त्यांच्यापर्यंत कधी कोणी पोहोचवलेच नव्हते .
मग लतिकाने स्वत:च्याच नावाने अर्ज दिला. बांधकाम विभागासोबत पाठपुरावा सुरू ठेवला. दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, आज आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की , लतिकाच्या प्रयत्नांनी सांगोला तहसील कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ स्वच्छतागृहाची सुविधा उभारण्यात आली आहे. यासाठी १२ लाखाचा निधी वापरण्यात आला. तसेच तहसीलमध्ये अर्ज केल्यामुळे कचेरीमधील स्वच्छतागृहाची दुरुस्ती ही केली गेली. हा सकारात्मक बदल आत्ता फक्त सांगोला तहसील पुरता झालेला असला तरी ‘कोरो’ म्हणून आम्हाला वाटते की, जेव्हा लतिकासारखी एखादी महिला आपला लघवीला जाण्याचा प्रश्न सुटला म्हणून तो मुद्दा तिथेच सोडून न देता, त्याचा सातत्याने पाठपुरावा करते. आपल्याप्रमाणे अनेक महिलांना हा प्रश्न येत असणार हे समजून , इतर महिलांशी बोलते. प्रशासनातील लोकांना भेटून , चर्चा करून , निवेदने लिहून प्रशासनालाही महिलांच्या मूलभूत गरजांविषयी संवेदनशील बनवते. दोन वर्ष हा मुद्दा लावून धरत , त्यावर काम करायला प्रशासनाला तयार करते तेव्हा छोट्या प्रमाणात का होईना पण एका बदलाची सुरुवात होते.
सांगोला तहसीलदार – अभिजित पाटील यांच्या सोबत फोटो
