कुनीकुणूर हे, सांगली जिल्ह्यात येणारे गाव; तसं पाहिलं तर लहानसं. कर्नाटक हद्दीपासून फारसं लांब नाही, साधारण वीस-पंचवीस किलोमीटर. गावात लोक कष्टकरी, रोजंदारीवर किंवा शेतीवर अवलंबून. गाव शांत आहे, पण या शांततेत एक कमतरता वर्षानुवर्षे गावातल्या लोकांनी गप्पपणे सहन केली होती. ती म्हणजे – गावात बाजारच नव्हता.

याच गावात आपल्या लीडर जयश्री शिवाजी नरळे राहतात. वय फक्त पस्तीस वर्षं. शिक्षण दहावीपर्यंत. राहणी साधी, बोलणं कमी, स्वभाव शांत. पण मनात मात्र कायम एक अस्वस्थता. आपल्या गावातल्या महिलांना आरोग्याच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी, होणारा त्रास त्यांना रोज दिसायचा . जयश्री ताई सोबत झालेल्या पहिल्या भेटीतसुद्धा त्यांनी सांगितले की, “ आमचे गाव अगदी खेडे आहे महिलांना त्यांच्या आरोग्य आणि आहार याची काळजी कशी घ्यायची याची विशेष माहिती नाही. अनेक महिलांचे हिमोग्लोबिन (HB) कमी आहे.बाईच नीट खाल्ली नाही तर घर कसं चालणार?”
त्या ‘कमल मंगल सोशल फाऊंडेशन, जत’ या संस्थेसोबत २ वर्षापासून जोडून काम करतात . गृहभेटी घेताना त्या महिलांचे प्रश्न ऐकतात. कुणाला चक्कर, कुणाला अशक्तपणा, कुणाला पोटदुखी, कुणाला कायम थकवा. विचारलं की, “काय खाता ?” तर उत्तर ठरलेलं – “जे मिळेल ते.” कारण चांगलं अन्न आणायचं तर १२ किलोमीटर दूर ‘माडग्याळ’ला जावे लागते.
भाजी, फळं, मासे, चिकन – सगळ्यासाठी गावाबाहेर जायला लागे त्यात वाहनांची काही सोय नाही. बऱ्याच महिला पायीच जात. पहाटे उठून, लवकर जाऊन, लवकर परतायचं. वेळ, पैसा, शारीरिक कष्ट – सगळंच जास्त. त्यामुळे अनेकदा बाहेर जायचंच टाळलं जायचं. घरात मिळेल तसं खाल्लं जायचं. हळूहळू याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत गेला.
जयश्री ताई हे सगळं पाहत होत्या, पण नेमकं करायचं काय, हे त्यांनाही कळत नव्हतं.
अशातच त्यांची निवड कोरो संस्थेच्या GLODP (Grassroots Leadership and Organisation Development Program) कार्यक्रमात झाली. पहिलं क्रॉस लर्निंग सावंतवाडीला होतं. एवढ्या लांब त्या कधीच गेल्या नव्हत्या. “जाईन की नाही?” असा प्रश्नच होता. शेवटी संस्थेचे प्रमुख ‘अमोल बाबर’ स्वतः त्यांना कोल्हापूरपर्यंत सोडायला आले. त्यांच्या आधारामुळेच जयश्री ताईंना धीर मिळाला .
सावंतवाडीत क्रॉस लर्निंगमध्ये सगळ्या लीडरनी आपल्या गावाचा नकाशा काढला. गावात काय आहे, काय नाही, कुठे अडचण आहे, कुठे संधी आहे – यावर चर्चा झाली. जयश्री ताईंनी नकाशाकडे पाहिलं आणि अचानक एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली.
आपल्या गावात बाजारच नाही.
तो क्षण त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला.
त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. ‘आपल्या गावात सगळं आहे – लोक आहेत, गरज आहे, खरेदी करणारे आहेत… पण बाजार नाही…’ हा विचार सतत त्यांच्या डोक्यात घोळत राहिला. सावंतवाडीहून परतताना त्यांच्या मनात एक निर्णय पक्का झाला –
“आपल्या गावातच बाजार सुरू करायचा.”


घरी परतल्यावर मात्र लोकांचा विचार मनात येऊन भीती वाटायला लागली. “लोक काय म्हणतील? एवढं मोठं काम जमेल का? ग्रामपंचायत ऐकेल का?” पण तरीही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
सर्वात आधी त्यांनी महिलांना एकत्र बोलावलं. बाजार झाला तर काय फायदा होईल, हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं.
– वेळ वाचेल.
– पैसे गावातच राहतील.
– ताजा आहार मिळेल.
– महिलांचं आरोग्य सुधारेल.
सुरुवातीला काही बायका घाबरल्या. “हे कसं जमणार?” पण जयश्री ताईंनी हार मानली नाही. ग्रामपंचायत कर्मचार्यांनी सुरुवातीला विरोध केला. “तुम्हाला वाटलं की होत नसतो बाजार त्याला नियम आहेत.ठराव लागतो”. असे त्यांना सांगितले गेले. मग जयश्री ताईनी तीस महिलांना घेऊन ग्रामपंचायतीत महिला सभा घेतली. पहिल्यांदाच इतक्या महिला एका मुद्द्यासाठी एकत्र आल्या होत्या. “बाजार टिकणारच नाही” असे म्हणणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना महिलांनी सांगितले की त्या स्वत: भाजीपाला विकायला बसतील तसेच याच बाजारातून सगळी खरेदी करतील. महिलांचा दृढ निश्चय बघून ग्रामपंचायतीनेही पाठिंबा दिला.

मग काय, हळूहळू महिलांचा आत्मविश्वास वाढू लागला. काहींनी ठरवलं ‘आपण भाजी विकू.’ काहींनी ‘पापड’ काहींनी – ‘कडधान्य.’ सगळं ठरायला वेळ लागला नाही. अवघ्या पंधरा-वीस दिवसांत तयारी पूर्ण झाली.
आणि 4 जानेवारी 2026 रविवारच्या दिवशी इतिहास घडला.
कुनीकुणूर गावात पहिल्यांदाच बाजार भरला.
पन्नास-साठ दुकानं लागली. भाजी, फळं, मासे, चिकन – सगळं काही. गावातच इतका माल पाहून लोकांचा विश्वास बसत नव्हता. पहिल्याच बाजारात अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांची उलाढाल झाली.
आज जयश्री ताईंच्या गावात दर रविवारी बाजार भरतो. महिलांना ताजा, पौष्टिक आहार मिळतो. अनेक महिलांना घराजवळच उत्पन्नाचं साधन मिळालं आहे.
हे काम ऐतिहासिक ठरलं. कारण गाव वसल्यापासून, भारत स्वतंत्र झाल्यापासूनसुद्धा, कुनीकुणूरमध्ये कधीच बाजार नव्हता.
जयश्री ताईंनी , स्वतःवर विश्वास ठेवला आणि संपूर्ण गावाचं चित्र बदललं.
आज जयश्री ताई म्हणजे केवळ एक कार्यकर्ती नाही, तर गावासाठी प्रेरणा आहेत.
एका साध्या बाईने ठरवलं, तर संपूर्ण गाव बदलू शकतं – हे त्यांनी करून दाखवलं आहे. यात त्यांना ‘कोरो’ची मदत झाली त्यांना कोरोच्या क्रॉस लर्निंग मधून बळ आणि प्रेरणा मिळाली अस त्यांचं म्हणणं आहे.